Wednesday, May 28, 2008

लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. लहानपणापासून डायरी लिहायचे मी, नाही म्‍हणायला. पण त्‍यातले विचार अतिशय अंदाधुंद, विस्‍कळीत असायचे. मला नक्‍की काय म्‍हणायचंय ते मी चपखल अशा शब्‍दात कधीच मांडू शकले नाही. सुरु एकीकडून केले तर शेवट दुसरीकडेच कुठेतरी व्‍हायचा. मूळ मुद्‍दा हरवूनच जायचा. आणि नंतर वाचायला घेतले की मीच हरवून जायचे त्‍यात.

मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्‍वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.

माझे विचार मी अजुनही स्‍पष्‍टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्‍वच्‍छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्‍यात आहे ह्‍याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्‍छा.

- सोनल मोडक