Friday, June 27, 2008

निसर्गाचा नियम

पावसाची सर
अंतरी काहूर
प्रीतीचा पाझर
दगडाला

वठलेला वृक्ष
जणू काळपुरुष
आशेचा धुमारा
त्‍यालाही फुटे

काडी काडी जोडून
चिमणीचे घर
पावसात बिचारे
गेले वाहून

इवलासा जीव
कसा कळवळे
तान्‍ह्‍या पिलासाठी
घर पुन्‍हा नवे

निसर्गाचा बघा
भला हा नियम
प्रलयातूनही
नवे जग साकारे..

- सोनल मोडक

मला मिळालेली एक प्रतिक्रिया,

सोनल,
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्‍या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्‍यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्‍यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.

माझं मत...

कसंकाय,
पोस्‍ट लिहीली ती इतरांची मतं जाणून घेता यावीत म्‍हणूनच. त्‍यामुळे तुमचं मत वाचून राग यायचा प्रश्‍नंच नाही. तुम्‍ही म्‍हणता ते अगदी खरे आहे. आजच्‍या घडीला माणूस मतलबी बनत चालला आहे, आणि मीही त्‍याला अपवाद नाही. कारण मीही त्‍याच समाजाचा एक घटक आहे. साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे नाही वाचली मी अजून. पण त्‍यांच्‍या कामाबद्‍दल मला नक्‍कीच माहीती आहे आणि मी त्‍याबद्‍दल त्‍यांचा आदरही करते. पण म्‍हणूनच सगळ्‍यांनाच त्‍यांच्‍यासारखं बनता येईल किंवा सगळ्‍यांनीच त्‍यांनी जे आणि जसं केलं तेच आणि तसं करावं याला माझा विरोध आहे. प्रत्‍येक जागृक नागरिक आजच्‍या घडीला जितकं आणि जसं, जमेल तसं सामाजिक बंधन पार पाडतोच आहे हा माझा अनुभव आहे.
आणि मीही त्‍याला अपवाद नाही. किती मोठी पेक्षा किती मनापासून आणि कुठे मदत करतो ते जास्‍तं महत्‍वाचं.

सो, माझी एकच विनंती की चार ओळी वाचून माणसाबद्‍दल मतं बनवू नका. कारण लिखाण हे प्रत्‍येकाच्‍या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं असं माझं मत आहे. त्‍यामुळे उद्‍याचं लिखाण आजच्‍या मतांपेक्षा वेगळंही असू शकतं. म्‍हणजेच कथा,कविता,स्वानुभव ह्‍याच्‍या पलिकडलंही !!!

- सोनल मोडक

Wednesday, June 25, 2008

कविता

तिची मी नेहमीच वाट पाहते
कधीतरी अवचित ती येते
अकल्‍पितातून अवचितपणे
अलवार, अलगद आठवणींच्‍या रुपाने...कविता उलगडते

-सोनल मोडक

हरेकृष्‍णजी,

आम्‍ही स्‍वत:च्‍याच व्‍यापात असे गुरफटून गेलोय अहो, की समाजाबद्‍दल विचार करायला वेळच नाही जणू...
विचार येतात, डोकं उत्तर शोधायचा छोटासा प्रयत्‍नं करतो, तेवढ्‍यात गँसवर ठेवलेलं दूध ऊतू जातं...
मग मला सांगा, समाजाचे प्रश्‍नं मोठे की शेगडी साफ करायची आवश्‍यता?
पेन घ्‍यावं काही लिहायला आणि तेव्‍हड्‍यात बाळाने शू-शू करावी...मग आली ना धावपळ !!

कळतंय हो सगळं...वळत नाहीय.
स्‍वत:च्‍याच पाशातून बाहेर डोकावून पाहील्‍याशिवाय गोष्‍टी दिसणारच नाहीयेत. पंचवार्षिक योजनेत आहे हा इश्‍यू आहे पाहिल्‍या नंबरवर...पण योजना पाचंच वर्षात संपते की नाही ते पहायचं.
गवर्नमेंटचा प्रोजेक्‍ट नाही हा, त्‍यामुळे वेळेत गोष्‍टी होण्‍याची शक्‍यताच जास्‍त, so... :) बघू !!

बुडबुडे

हवेत तरंग, पाण्‍यावर बुडबुडे उठतंच राहतात. छोटे छोटे बुडबुडे पाहायला मजा वाटते. हजारो बुडबुड्‍यांमधून मोजकेच मोठे होतात, बाकी बिचारे कधी येतात आणि कधी जातात काही हिशोब राहत नाही...चकचकीत पृष्‍ठभागावर सप्‍तरंग चमकतात. पाहणारा प्रत्‍येक जण मोहून जातो त्‍यांना बघून. जिवाच्‍या आकांताने पाठपुरावाही करतो त्‍यांचा..अंतापर्यंत...स्‍वत:च्‍या ! पण त्‍यानी मोठं होणं त्‍याच्‍या नशिबात नसतं लिहिलेलं..तो तसाच छोटा बुडबुडा म्‍हणूनच फुटुन जातो.
ठरवतं तरी कोण की कोणी मोठं व्‍हायचंय आणि कोणी छोटंच राहायचंय?
तुम्‍ही भलेही माराल हो हातपाय मोठं होण्‍यासाठी...पण सागळ्‍यांनाच यश मिळतं? कोण ठरवतं मग, की ह्‍याच्‍या प्रयत्‍नांना यश द्‍यायचं आणि ह्‍याला तसंच हातपाय मारत सोडून द्‍यायचं?

इथे "देव" हे उत्तर मला नक्‍कीच अपेक्षित नाही !!

पण खरं उत्तर तर मलाही माहित नाही अजून.
तुम्‍हाला माहीत असेल तर मला नक्‍की सांगा...

-सोनल मोडक

Monday, June 09, 2008

मला काय हवंय?

पैसा : हो! निश्‍चितच त्‍याशिवाय मन:शांती मिळणं कठीण. मला कोणी टाटा-बिर्ला नाही व्‍हायचंय.
पण कधीही मनात आलं (माझ्‍या किंवा माझ्‍या जवळच्‍यांच्‍या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्‍यावर पैसे नाहीत ह्‍या कारणाने नाही म्‍हणायला लागू नये. एव्‍हडा पैसा तरी हवा.
नक्‍कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्‍वस्‍थ झोपही मिळावी.

शिस्‍त : त्‍याशिवाय माणसाची ultimate वाट लागू शकते. मी अनुभवते आहे ती स्‍थिती सध्‍या ! moody असणं ठीक आहे. त्‍यात काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत. पण आयुष्‍‍यात शिस्‍तं असणं फार आवश्‍यक.
ज्‍यामुळे day-to-day duties करता करताच फे-फे नाही होणार. energy loss नको त्‍या गोष्‍टीत आणि त्‍याच त्‍याच गोष्‍टींत नाही होणार. नवनवीन गोष्‍टी करायचा उत्‍साह शाबूत राहील. जिवंतपणा टिकून राहण्‍यासाठी नाविन्‍य अत्‍यावश्‍यक.
शिस्‍तीबरोबर स्‍वस्‍थ आणि निरोगी मन आणि शरीर आपसूकच येणार.

मन:स्‍वास्‍थ्‍य / समाधान / peace of mind : overall 100 पैकी जास्‍तीत जास्‍त कामं यशस्‍वी व्‍हायला लागली की छोटी छोटी अपयशं ( failures) मनावर तितकासा नकारात्‍मक परिणाम नाही करणार. त्‍यांना शांतपणे तोंड द्‍यायची शक्‍ती पण सहज मिळेल. भिजत घोंगडी न राहता यशस्‍वीपणे संकटातून बाहेर पडायचे मार्ग सूचत राहतील.

संकटं किंवा दु:ख नकोत असं मी कधीच नाही म्‍हणणार. पण त्‍यांना तोंड द्‍यायला, त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी विचार करायला शांतचित्त फार आवश्‍यक. मनासारखी माणसं भोवती असणं किंवा भोवती असलेल्‍या माणसांना आहेत तसं स्‍वीकारणं ह्‍यातूनच सर्व सोपं होणार. मात्र टाळी वाजणयासाठी दोन हात हवेत. नाहीतर दुसर्‍याला जोरदार फटकाच बसायचा.

चारचाकी वाहनाचं wheel balancing काही उगीचंच नाही करत. तोच नियम माणसालाही लागू पडतो.

कुठचंही नातं, अगदी कुठचंही नातं (आई-मुल, नवरा-बायको, भावंडं अगदी नोकर-मालक सुद्‍धा) नातं यशस्‍वी होण्‍यात दोन्‍ही बाजूंकडून एकसारखे प्रयत्‍नं होणं आवश्‍यक. नाहीतर त्‍यातल्‍यात्‍यात weak बाजूची फरपट आणि strong बाजूची गळचेपी होणं अनिवार्य. friction मधून झीज होते. नात्‍यातला ओलावाही नाहीसा होवू शकतो. एकदा त्‍या stage ला पोहोचल्‍यावर पुन्‍हा ओलावा निर्माण करण्‍याचे प्रयत्‍न माणसाचा कस खाऊन जातात. त्‍यासाठी वेळच्‍यावेळी मतं clear करणं आवश्‍यक.

एक बेसिक गरज : संवाद तेव्‍हाच होवू शकतो जेव्‍हा दोन व्‍यक्‍ती सम पातळीवर येतात आणि तेव्‍हाच त्‍या जे बोलतात ते एकमेकांपर्यंत पोचतं. मधल्‍यामधे हवेत विरलेल्‍या भवना आणि शब्‍द गैरसमजच वाढवतात. त्‍यामुळे स्‍पष्‍टं आणि स्‍वच्‍छं विचार आणि बरोबर शब्‍दांचा वापर फार आवश्‍यक. माणसाचे विचार दुसर्‍यापर्यंत पोहोचवण्‍यासाठी अजून तरी शब्‍द-संवाद हा एकच मार्ग वापरला जातो.
(telepathy वगैरे दूरच्‍या गोष्‍टी. मनच जिथे थार्‍यावर नसेल, तिथे स्‍वत:लाच स्‍वत:चे विचार ऐकू येणं मुश्‍कील
तर दुसर्‍यापर्यंत तुम्‍ही ते मन-to-मन काय पोहोचवणार.) असो !
त्‍यामुळे आपल्‍याला काय वाटते ते समोरच्‍याला माहित होणं अगदीच आवश्‍यक. जेव्‍हा माणसा-माणसांत भिंती उभ्‍या राहतात, भावनाच काय शब्‍दही दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत मग !

बस्‍स ! फार काही नाही, इतकंच. ह्‍या सगळ्‍या कमवायच्‍याच गोष्‍टी आहेत म्‍हणा...free में कुछ भी नही मिलता.

माझ्‍या ह्‍या काही ईच्‍छा, फार मोठ्‍या नाहीत. पण त्‍यात involved sub-sections लिहायला घेतले तर मात्र फार मोठी गोची होईल सो लिखाण इथेच थांबवून विचारांना थोडी गति देते..काय !!