या सगळ्याची सुरुवात घरी झालेल्या एका पार्टीतून झाली. अनेक लांबचे, जवळचे नातेवाईक खूप दिवसांनी भेटले. सुरुवातीला अर्थातच कोण सध्या कशात बिझी आहे, याबद्दलची माहिती एक्स्चेंज झाली. मग हळूहळू गप्पा रंगल्या. राजकारण ते सिनेमा ते क्रिकेट- सगळ्याचा फडशा पाडला गेला. एखादा विषय जुना होतोय असं वाटायला लागलं की कोणीतरी नवीन विषय काढायचं. कोणाला रिकामे क्षण जाऊ द्यायचे नव्हते. सगळा वेळ गप्पांनी भरून काढायचा होता. सगळ्यांना बघून असं वाटत होतं की, बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाल्यामुळे ते सुखावलेत. क्वचित आणता येणारा सैलपणा अनुभवत रमताहेत. हळूहळू या जागेचे होऊन जाताहेत. पण मग तरीही त्यांच्यात बसलेलं असूनही मला प्रेक्षक असल्यासारखं का वाटत होतं? प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये एक अंतर का जाणवत होतं? प्रत्येकजण कसलंतरी अवधान ढळू न देण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यामुळे एकमेकांच्या कंपनीत स्वत:ला सुरक्षित मानू शकत होता. हे सगळे एकेकटे होते, पण तरीही त्यांची एक टीम असल्यासारखं वाटत होतं.
आणि मग लक्षात आलं की, नेमकं हेच आपल्याला खटकतंय.. त्रास देतंय. कोण कशामुळे चिडतं, कशाच्या बाबतीत हळवं होतं, आणि काय ऐकून आनंदतं, याचं भान राखून नाती जपणं, हे या टीमचं सूत्र. आणि हे सूत्र पाळून इथल्या प्रत्येकाला या टीमला हक्कानं गृहीत धरता येतं. मग त्याही पुढे जाऊन प्रश्न पडला की, हे आपल्याला काय नवीन आहे? बाहेर जगात हिंडताना आपण हे सतत बघतो. फक्त ते इतकं सवयीचं झालं आहे की, आता ते वेगळं जाणवतही नाही. तिथे प्रश्न सूत्र पाळण्याचा नसतोच, फक्त टीम निवडण्याचा असतो, हे जाणवलं आणि अचानक पोटात खड्डा पडला. कसलीतरी प्रचंड भीती वाटली. हे जे काही जाणवतंय, त्याचं काहीतरी करायला हवं, असं कळवळून वाटलं. पण काय, ते कळत नव्हतं. खूप दिवसांपासून मनात डोकावत असलेली एक इच्छा पुन्हा हात दाखवून गेली आणि मी उठले आणि कॉम्प्युटरसमोर जाऊन बसले.
ब्लॉगस्पॉटवर गेले आणि नवा अकाऊंट उघडला. समोर एक रिकामी चौकट मला बोलावत होती. एक जा-ये करणारी दांडी मी माझं म्हणणं तिथे उतरवण्याची वाट बघत होती. हे म्हणणं कुठेही सुरू होऊन कुठेही संपू शकत होतं. ते काहीही असू शकत होतं. मी कोणाशी बोलावं, त्याप्रमाणे ते बदलण्याची अपेक्षा नव्हती. त्याप्रमाणे त्याला नटवण्याची अपेक्षा नव्हती. हातचं न राखता मला बोलता येणार होतं. कारण एरवी माझ्या व्यक्तिमत्त्वासोबत माझी ‘ओळख’ म्हणून चिकटून येणाऱ्या गोष्टी इथे नव्हत्या. ही चौकट माझ्या नावात अडकली नव्हती.
..अशी सुरुवात झाली. नियमांत न बांधलेल्या नात्याची. ब्लॉगवर मी भडाभडा बोलत गेले आणि त्याला तितक्याच भडाभडा प्रतिक्रिया येत गेल्या. त्या प्रतिक्रियांची माझ्या मनात माणसं कधी झाली, हे कळलंसुद्धा नाही. आणि तितक्याच नकळत मी त्यांना माझे मित्र- मैत्रिणी मानू लागले. सुरुवातीला काही कठीण निर्णय पडताळून बघणं व्हायचं. त्यावर या मित्रमंडळींची निखळ, स्पष्ट मतं यायची. त्यामुळे निर्णय सोपा व्हायचा का? तर मुळीच नाही. पण तो घेण्यामागचा विश्वास ठाम व्हायचा. धाडस यायचं. हळूहळू जास्त आतलं, जास्त पर्सनल बोललं जाऊ लागलं. एरवी कोणासमोर चुकूनसुद्धा मी काढले नसते असे विषय मी उघडपणे तिथे ब्लॉगवर मांडू लागले. स्वत:चं काही पर्सनल सांगू लागले. खूप हलकं वाटायचं. कधी तसंच वाटणारे इतर समोर आल्यामुळे दिलासा वाटला, तर कधी कोणी माझी खिल्ली उडवली म्हणून दुखावलं जायला झालं. मग ब्लॉग ही एक गरज होऊन गेली. पाहिलेल्या फिल्मबद्दल मत, केलेल्या प्रवासाचं वर्णन, एखाद्या ऑफिसात आलेला अनुभव, भेटलेली नवीन माणसं, कोणता लॅपटॉप घ्यावा याबद्दल विचारपूस, रस्त्यावरच्या खड्डय़ांबद्दलच्या तक्रारी.. काहीही पटकन् मांडायला ही एक हक्काची जागा झाली.
मध्यंतरी एक सद्गृहस्थ माझ्याशी भांडले. ‘व्हर्चुअल स्पेस’ असं काही नसतं म्हणून. ब्लॉगवर थिल्लर, आत्मकेंद्रित बडबड चालते म्हणून. खऱ्या हाडामासांच्या माणसांना सोडून या अवकाशात तरंगणाऱ्या आवाजात मी हरवतेय म्हणून. स्वत:साठी सगळं करणं सोडून मी ‘संवाद’ साधण्याचं महत्त्व समजून घ्यायला हवं म्हणून. असं निनावी आयडेंटिटी घेऊन जबाबदारी झटकणं सोपं आहे म्हणून.इथली, ब्लॉगवरची नाती सोपी नाहीत. निनावी स्पेस असल्यामुळे प्रामाणिकपणा सहज येत असला तरी त्यामुळे त्या नात्यांना आपोआप एक धारही येते. अनेकदा अत्यंत परखड टीका पचवावी लागते. हे आवाज अधांतरी नाहीत. उलट त्यांना वयाचं, रेप्युटेशनचं, बॅकग्राऊंडचं बंधन नाही. त्यांच्यात कसलाही आव नाही. ते या सगळ्यांतून मुक्त असल्यामुळे जास्त खरे आहेत. इथल्या नात्यांना कोणताही ‘मतलबीपणा’ जोडून ठेवत नाही. आणि सगळ्यात रिफ्रेशिंग गोष्ट म्हणजे या सगळ्यामुळे इथे बसायला कुंपण नाही! सुरक्षित स्टँड घ्यायचा घाबरट मार्ग नाही!!मी फक्त स्वत:साठी लिहीत असते तर मी डायरी लिहिली असती, ब्लॉग नव्हे. त्यामुळे संवाद साधण्याची गरज असल्याशिवाय ब्लॉगस्पॉटची लोकसंख्या एवढी वाढली नसती. आणि कोणत्याही जड तत्त्वज्ञान सांगणाऱ्या विद्वान सल्ल्यांपेक्षा कुणाचे साधे, पण खरे अनुभव खूप जास्त शिकवून जातात, असं मला वाटतं. या एकप्रकारच्या एकटेपणाची चटक लागत असताना एक मात्र सतत होत असतं- ब्लॉग हे काही बाहेरच्या जगाचा पर्याय होऊ शकत नाहीत, हे सत्य मध्येच चटका देऊन जातं आणि डोळे ताणून आजूबाजूच्या जगात तितकेच खरे, प्रामाणिक, जिवंत आणि बिनधास्त आवाज शोधायला होतं.
- इरावती कर्णिक
loksatta, chaturanga
saturday, 28th march 2009