Monday, December 08, 2008

प्रार्थना

एक आदिमानव ते एक अतिप्रगत मानव असा माझा प्रवास बराच लांबवरचा झाला. एक बुद्‍धीमान प्राणी,
माणूस म्‍हणून मी इथवर येईन असा विचारही कधी केला नव्‍हता मी.
मी अतिप्रगत - पण बंदुकीच्‍या एका गोळीलाही माझं मला तोंड नाही देता येत. माझी शकलं-शकलं उडतात.
मी अतिप्रगत - पण मला माझ्‍या शत्रुचा चेहरा नाही ओळखता येत. पाठीमागून नाही तर समोरून वार करून
शत्रू मला चीत करतो.
मी अतिप्रगत - मी असा भावनाविवश की मी कोणाला मरतांना नाही पाहू शकत कारण मी कोणाला मारत नाही.
मी अतिप्रगत - स्‍वत:भोवती चार भिंतींचं जग उभारून मनाला खोटंच समाधान देत राहतो की मी इथे सुरक्षित
आहे. त्‍याबाहेर कोणालाही मदत करायची माझी तयारी नाही.
मी तत्‍वनिष्‍ठं. पण माझ्‍या तत्‍वांचं सामर्थ्‍य माझं मलाच ज्ञात नाही. शत्रू समोरुन माझ्‍या घरात शिरून माझ्‍या
स्‍वप्‍नांचा चक्‍काचूर करुन जातो. ना मी शस्‍त्र बाळगतो ना मी ते चालवायला शिकलोय.
स्‍वत:ची शिकार स्‍वत: करणं तर सोडाच, पण स्‍वत:चा बचावही मी स्‍वत: करु शकत नाही.


पण मनाच्‍या शक्‍तीवरचा माझा विश्‍वास अजून डळमळला नाहीए. प्रार्थनेचं सामर्थ्‍य मी जाणतो. मी प्रार्थना करु शकतो.
स्‍वत:च्‍या आणि इतर सर्व मित्रांच्‍या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी !!!

No comments: