Friday, March 28, 2008
आठवण...
जशी वार्याची झुळुक
तळपत्या सूर्याखाली
सुखद शीतल सावली
तुझी आठवण,
जशी वेडी श्रावणसर
पाचूंच्या हिरव्या बनात
ओलेतं ऊन उबदार
तुझी आठवण,
वाळवंटातलं मृगजळ
आभसी मायावी
पळते क्षितिजापार
तुझी आठवण,
जसा रातराणीचा सुगंध
रात्रीच्या नीरव शांततेत
बेभान, मंत्रमुग्ध
तुझी आठवण,
जसं कुपीतलं अत्तर
कसं न् केव्हा उडून जातं
पण भिनतो सुगंध नसानसात
तुझी आठवण,
दडवलेला खजिना
पडझड झाली वाड्याची
तरी जाईना आस
तुझी आठवण,
विष जहरी
आयुष्यं होतं बधीर
प्याला नको पुरे एकच घोट ...
- सोनल मोडक
Monday, March 24, 2008
आठवणी
चालावं म्हणता, काही केल्या पाऊल पुढे पडत नाही
अनंत जुन्या आठवणी मनाचा कोपरा सोडून
येऊन बसतात पृष्ठभागावर अडमुठ्यासारख्या हटून
विसरू म्हणता विसरत नाहीत, आठवणीच त्या
बंड करुन उठतात वैरीणी जणू दाही दिशा
मी मग माघार घेऊन स्वत:ला त्यांच्या स्वाधीन करते
आडवेळी मी मग अगम्यं स्वप्नांच्या अधीन होते...
- सोनल मोडक
Sunday, March 23, 2008
आपण सारे अभिमन्यू..
आजच्या घडीला सरत्या शतकाच्या वळणावर एकूणच सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे. आजचा अभिमन्यू त्याला अपवाद नाही. समाजात जसं एक गोंधळाचं वातावरण आहे, तसं ते अभिमन्यूच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आहे. त्याची नोकरी, त्याच्या सवयी, त्याच्या इच्छा आकांक्षा आणि भोवतालची रोजच्या संपर्कातली माणसं या सर्वात त्याची कोंडी झालेली आहे. ज्याच्याकडे मन मोकळे करता येईल, जो खरा खरा मदतीचा हात पुढे करेल, अशा एका साथीदाराच्या तो शोधात आहे.
एकलेपणा आणि नैराश्य यातून बाहेर पडून त्याला आनंदाचे क्षण वेचायचे आहेत. त्यासाठी अनिश्चिततेच्या या चक्रव्यूहातून त्याची त्यालाच सुतका करुन घ्यायची आहे. त्याच्याकडे ह्याशिवाय दुसरा पर्याय नाहीय. परस्पर विरोधी गोष्टींनी भरलेल्या स्वत:च्या व्यक्तीमत्वाची त्याला जाणीव होणं आवश्यक आहे. सगळीकडे गोंगाट, गजबजाट आहे आणि त्यातूनच त्याला सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. तमाम भौतिक गरजा पुरवणारं भोवतालचं जग, जे आत्मशक्तीचा, आत्मोन्नतीचा मार्ग दाखवू शकत नाही, अशा आजच्या जगाचाच तो एक भाग आहे. अशा ह्या गोंधळलेल्या अवस्थेत तो कधी निकरावर येत तर कधी स्वत:ला भिरकावून दिल्यासारखा जगत राहतोय। समाजाची आजची अवस्था अशीच झाली आहे। आणि अशा वेळी अभिमन्यू काय किंवा एकूणच समाज काय, नेमकं कुठल्या प्रकारचं भविष्य अपेक्षितो आहे, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. मला इथे एक गझल आठवते,
अपनी मर्जीसे कहां अपने सफर पर हम है,
रुख हवा का जिधरका है उधरके हम है॥
माझं हे मत वाचणार्या प्रत्येकाने यावर विचार करावा. मला असं वाटतं हे तर मी स्वत: जगत आलेय आजपर्यंतं. दरवेळी स्वत:ला जाणता- जाणता तपासून पाहत किंवा आसपासच्या वातावरणाशी जमवून घेत, स्वत:च्या मनाला न पटणार्या गोष्टी करतांना मी मझी स्वत:ची ओळखंच विसरुन बसते. पण ही गोष्टं तितकीच खरी की प्रत्येकालाच यात एखादातरी आशेचा किरण, एक दिशा मिळतेच. तो किरण मला मिळाला आहे...
नकारात्मक दृष्टीकोण पूर्णपणे बदलायचा प्रयत्नं करणार आहे. पण नव्याच्या शोधात जुने गमवायचा मूर्खपणा मी करणार नाहिये. तुम्हीसुद्धा लवकरच यावर विचार करा आणि वेळ हातातून जाउ देऊ नका। -
सोनल मोडक
मोहोळ
आठवणींचं काहुर माजवून जाते
मन होतं सैरभैर असं
वादळात सापडलेलं पाखरु जसं
- सोनल मोडक
Thursday, March 20, 2008
सावर
उंच तुझी भरारी
घाल पालथ्या दाही दिशा
पण ये परतोनी माघारी
देश परका न मिळेल थारा
अनोळखी सारे चेहरे
इवलेसे पण घर आपुले
तुझ्या वाटेकडे लागले डोळे...
- सोनल मोडक
Sunday, March 16, 2008
बंध
अशी सांज यावी
दुरावा स्वत:शी
तुझ्याशी तुटावा
गात्रांतून स्वच्छंदी अन्
अंतरात घुसमटलेला
पाऊस कधीतरी
बेफाम बरसावा
बंध रेशमी तुझ्यासवे
अलगद असे जुळावे
जसा फुलासवे सुगंध
जसा धुक्याचा गहिरा रंग...
- सोनल मोडक
Saturday, March 15, 2008
चांदवा
आकाशी चढे सोनेरी साज
दिवसावर करे रात चढाई
प्रकाश-काळोख करती लढाई
सूर्या सारखा सूर्यदेव तो
चंद्रराजाच्या हाती हारतो
येती चांदण्या आकाशी एकेकं
साजरी कराया शीतलं जीतं
रातराणी होते मनी हर्षितं
येणार हो तिचा चांदवा मितं...
- सोनल मोडक
बकुळ
जशी काळ्या ढगाला सोनेरी किनार
हातावरच्या रेषांचा सगळा गुंता
गाठीवर गाठी मनी पडता
बघता बघता नाती पुसंट होतात
सुकलेल्या पाकळ्या गळून पडतात
बकुळीचा सुगंध खरा अविट
नि:श्चेतन तरी भरे आसमंती ...
- सोनल मोडक
Friday, March 14, 2008
वणवा
भाग्याचा भरोसा नसतो
एका ग्रहाची करावी शांतं
तर दुसरा आडवा येतो
अशी कितीतरी नवीन नाती
दिवसागणिक बनत जातात
काही जखमा अगदी भरुन जातात
तर काही भळभळून वाहतात
असे काही प्रश्नं कसे अवघड बनतात
तर काही भूर्रकन सुटून जातात
वाटतो प्रत्येक क्षण भरभरुन जगावासा
वणव्यात पेटलेल्या लाकडासारखा,
आपला अंतं बघावासा...
- सोनल मोडक
Wednesday, March 12, 2008
आधारीत
शोधू कुठे आणि कसे
हुंदक्यांनी आड वेळी
जाग डोळा येतसे...
वाहती थंड गार वारे
शिरशिरी आली पुन्हा
हात पाठीवरुन फिरला
वेदना तरी उरलीचं ना...
- सोनल मोडक
Tuesday, March 11, 2008
प्रश्नोत्तर...
झिजलेल्या वस्त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण, विरलेल्या नात्यांना,
फाटलेल्या आभाळाला?
भेगाळलेल्या जमिनीला?
कसं रे?...
- सुषमा करंदीकर
उत्तर..
फँशन आहे ठिगळांची कपड्याला
नवीन नाती येतील जन्माला
ढगांची नक्षी रचू आकाशी
भेगांतून येइ नवे रोप वरती...
- सोनल मोडक
Thursday, March 06, 2008
बंड
शब्दांनी पुकारले बंड
वाटले मनीचा सूर हरवला
जणू अंतरातील धग झाली थंड...
ऊन सावलीचा खेळ सारा हा
कधी श्रावण कधी वसंत
एकमेकांवर मात कराया
ऋतूंस मिळेना उसंत...
तरी पुन्हा पुन्हा तिकडेच पळे
जसे उनाड वासरू
मनं भिरभिरे वार्यासंगे रे
झाले जणू वेडे पाखरु...
अक्षराला जुळे एकेक अक्षरं
शब्दांचे पडति सडे
शब्दं आला मागे सूर घेवोनि
मनी गाणे उलगडे...
- सोनल मोडक
डोळ्यांत...
बरसले मेघ धुवांधार
सृष्टी ल्याली हिरवा साज
जागला मनी नवा उल्हास...
डोळ्यांत उतरले स्वप्नं नवे
मन झाले पाखरु आज
चांदणे मनीचे आज हवे
कुजबुजली मनी नवी गाज...
डोळ्यांत चमकला चंद्र आज
कलेकलेने तो उजळे
लख्खं चांदणे पुनवेचे ते
गर्विष्ठ रवीसही लाजवे...
- सोनल मोडक