बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली, कोणी व्यक्ती
बारिकतेने बघता कळले, हुबेहुब ती प्रतिमा माझी दुसरी होती
घाबरलो मी, चाचरलो मी, पुसले त्याला, कोण कशाला
स्मित संभावित करुनि म्हणे तो, पिशाच्च मी तव
गतकाळाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला, म्हणुनी आलो
पिशाच्च, पण ते माझे होते, आपुलकीने स्वागत केले, गप्पा झाल्या
दुरपणाचे अंतर सरले, आठवणींचे पर्व चाळता काळिज कढले
बाद-बखेडे कधी पेटता, कृद्ध शार्दुलासम गुरगुरलो
प्रेम द्वेष हास्यांत रंगता स्वरही चढले
अखेर होता पहात, गेला एक आमुच्यामधला निघुनी
गेला कोण अन् कोण राहिला हे मज आता जन्मभराचे कोडे पडले...
- कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment