Tuesday, February 24, 2009

to my online friends...

आज लागली ही बया हाती. वापरीन वापरीन म्‍हणत मीनलने कधी ही डायरी उघडलीच नाही आणि मीनलचा तिच्‍यावर जीव जडला म्‍हणून मी कधी तिला हात लावला नाही. आज लिहायची ऊर्मी आली आणि ही समोर हजर. As they say it,"I can resist everything but temptation..." २००९ ची पहिलीक्षरं ह्‍याच डायरीत लिहायची !!

हल्‍ली असं झालंय ना की मित्रमंडळींना भेटायलासुद्‍धा निमित्तं शोधावी लागतात. सहजच कोणाकडे टवाळक्‍या करत तासंतास बसलोय असं कधी होतच नाही. सगळेच जण busy. अगदी श्‍वास सुद्‍धा मोजून मापून घ्‍यायला लागलोय आपण. अशा वेळेस intenet through काहीही कारण नसतांना भेटलेल्‍या व्‍यक्‍ती (त्‍यांना मित्र म्‍हणावं की नाही ते ठरवलं नाहीये अजून) जास्‍त जवळच्‍या (पेक्षा easily accesible) वाटतात. प्रत्‍यक्ष अंतरामुळे त्‍यात काही फरक पडत नाही. अशा मित्रांशी बोलतांना मला जास्‍तं मोकळं वाटतं. काही लागेबांधे जुळलेले नसल्‍यामुळे असेल बहुतेक. कारण अशावेळी मुडस्‌ वगैरे फारसे मधे येत नाहीत. एकमेकांना पूर्णपणे अनभिज्ञ असल्‍यामुळे भोवतालच्‍या परिस्‍थितीचा आमच्‍यातल्‍ला गप्‍पांवर फारसा प्रभाव पडत नाही. कोणाकडून काही अपेक्षा नाहीत, त्‍यामुळे काही गमावण्‍याची भिती नाही. प्रत्‍यक्षातल्‍या सर्व नात्‍यांना समांतर असं हे नातं. जिथे मी 'मी' असते अगदी सर्वतोपरी.
तसं प्रत्‍यक्षात होत नाही. कोणाला काय वाटेल ह्‍या दडपणाखाली हल्‍ली माझे शब्‍द तोंडातल्‍या तोंडातच घोळत राहतात. गैरसमज होण्‍यापेक्षा arguments होऊ न देणंच प्रशस्‍त वाटतं. गेल्‍या काही वर्षात रागावर काबू मिळवला मी पण आजुबाजुच्‍या बर्‍याच गोष्‍टींसाठी मूक प्रेक्षक बनून राहीलेय मी. नुसतीच बघ्‍याची भूमिका घ्‍यायची सवयच लागली आणि हळूहळू शब्‍दांनीपण पळ काढला. आतल्‍या आत एक वेगळच विश्‍व तयार झालय माझं. तशी पारदर्शकता बाहेर मिळेनाशी झालीय. पण असं स्‍वत:शीच किती बोलणार. आपली मतं मांडायलासुद्‍धा कोणाचातरी कान हवा असतोच की सगळ्‍यांना.

मिळणारे नवनवीन अनुभव आपल्‍याला मोठं करत असतात. वेगवेगळ्‍या बेटांवरुन टप्‍प्‍याटप्‍प्‍यानी आपण पुढे जात राहतो. प्रत्‍येक समुहात एक वेगळा मुखवटा चढवून वेळ साजरी करायची. मग अवचित कधी जुन्‍या बेटांवरचे सवंगडी पुन्‍हा भेटतात. त्‍यांच्‍यासाठी हा मुखवटा नवा असतो. कधी सूर पुन्‍हा जुळतात, पण जुळतातच असं नाही. पण अशात हे समांतर मित्र जवळचे वाटतात. ते तर असतातच कायम एका बटणाच्‍या अंतरावर. मुखवट्‍याशिवाय, जसेच्‍या तसे. एका पिंगची खोटी !!!

- सोनल मोडक

No comments: