आपण मातीच्या मनात मिसळून तिचं व्हावं, तिनं आपल्यात मिसळून आपलं व्हावं, अन् असं उमलत रहावं, हे ज्ञानच आकाशाला नाही. ती समजुत आहे पाण्याला. म्हणून माती पाण्याशी खेळते. पाण्यात भिजते. मोहरते. ऋतूमती होते. आभाळाला ती अस्पर्श आहे. तिला त्याला भेटावसं वाटलं तर पाण्यात बिंबावं लागतं. असं पाण्यात मिसळून, पाणी होऊन गेलं तरच ती अनंत अंगांनी भेटते, बिलगते, नवे सर्जनेतिहास घडविते. तुम्ही हा संबंध समजून घ्याल तर मग माती फ़क्त हरळीला आणि कुंभारालाच कळली आहे, असं मी का म्हटल याचा उलगडा होऊन जाईल.
No comments:
Post a Comment