पण शब्द गोळा करण्यात मी कमी पडतेय...अमल झपाट्याने मोठा होतोय.
काय लिहु आणि काय नको...तसं पाहिलं तर खूप काही आहे, पण...
हा पण कसा कुठून येतो देव जाणे.
इतका जिवंतपणा, ती विजिगिषा, सळसळता उत्साह...सगळं शब्दात पकडणं कठिणंच.
डोळ्यासमोर आहे ते त्याचं पहिलं वहिलं रुप. ते इवलेसे डोळे टकामका माझ्याकडे बघणारे.
त्यांना जाणीवही नसेल हा जो काही चेहरा दिसतोय, त्यावर हा जग जिंकल्याचा आनंद कुठूनसा आला असावा.
हिच आपली आई...आपण हिच्या पोटात पूर्ण नऊ महिने वाढलोय.
आपलं अस्तित्वं पूर्णतः हिच्या अस्तित्वावर बेतलेलं आहे.
इवलासा तो जीव...अबोध . जग काय असतं तेही न पाहीलेला आणि त्याला नेलं माझ्यापासूनु मैलोन्मैल दूर.
आईचं दूधसुद्धा नाही प्यायला आणि हिरो निघाला गाडीमधून...एकटाच.
आहे खरा शूर सिपैया...आईशिवाय कुठून आणली ही ताकद त्याने.
अज्ञानाची हीच ती शक्ती काय. मग कशाला हवं ज्ञान...मनाला कमकुवत बनवायला.
कोण देव, काय देव, कोण आई, बाबा, आजी, आजोबा...तो कोणालाच नाही ओळखंत.
त्याला माहितीये फक्तं आपलं अस्तित्वं टिकवणं. पण ते सुद्धा किती दुसर्यांवर अवलंबलेलं...
साधं मला भूक लागलीये हे सुद्धा सांगता येणार नाही त्याला. आला आपला बिनबोभाटपणे या जगात. हा काय विश्वास...(काय हा विश्वास). ज्या मंडळींच्या हातात पडणार ते बघतील काय ते... तारायचं की मारायचं.
भयानक आहे कल्पना सुद्धा. नकोच तो विचार, विचारांतसुद्धा.
अगम्य आहे सगळं. देव देव तो हाच बहुतेक. निसर्गाचा खेळ झालं.....
-सोनल मोडक
No comments:
Post a Comment