Tuesday, April 27, 2021

काळजी घ्या !!

माझं लिखाण गेली कित्येक वर्ष बंद पडलं होतं. मग काय माझं विचार करणं बंद झालं होतं? की माझ्या संवेदना बोथट झाल्या होत्या? दैनंदिन व्यवहार तर बिनधोक चालू होते. नवीन माणसं भेटत होती. चांगले वाईट अनुभव येत होते. पण मला काही नवीन बोलावसं वाटत नव्हतं. काहीसा तोचतोचपणा आल्यासारखं झालं होतं. कुठल्याही गोष्टीत नाविन्य वाटणं कमी झालं होतं. होतं असं कधी. जशी हाताची सगळी बोटं एकसारखी नसतात, तसेच सगळे दिवसही सारखे नसतात. थोडं मीठ कमी जास्तं व्हायचंच. 

मी वाट बघत होते एखाद्या बदलाची. आणि असंही नाही की मी काहीही नं करता तो यावा असा माझा अट्टाहास होता. विचारांना दिशा देणं माझ्यापरीनं चालूच होतं. शेवटी मलाच तो बदल घडवून आणायचा होता. हे मला ठाम माहीत होतं. भुतकाळात असे काही बदल मी घडवून आणलेच होते की. बरंच काही शिकायला मिळालं होतं. मी चांगलीच अनुभवसिद्ध झाले होते. कल्पनेतही विचार केला नव्हता, हा असा बदल माझ्याच नाही तर अख्या जगासमोर असा येऊन ठेपेल. कोणीच त्यादृष्टीने तयार नव्हतं. 
आधी धडपडत, थोडीशी परिस्थिती समजून घेत प्रत्येकजण सामना करायचा प्रयत्न करत राहीला. गेल्या वर्षभरात जगभरात फार उलथापालथी घडून गेल्या. अशी एकही व्यक्ती नसेल जिला परिस्थितीचा धक्का नसेल बसला. कमीजास्तं प्रमाणात का होईना पण प्रत्येकाच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. 

जेवणाचे डबेच काय बनव, भाज्या-फळं अशा जीवनावश्यक वस्तू काय विक, वयस्कर लोकांना विना मोबदला लागेल ती मदत कर, अगदीच काही नाही तर आपल्या स्टाफला पूर्ण पगारी सुट्टी दे, पैशाची मदत काय, अन् अन्नधान्याची मदत काय, असे एक नाही हजार उद्योग प्रत्येकाने आपल्या परीने केलेच असणार. शेवटी आता अशी परिस्थिती आहे की जगातला सगळ्यात श्रीमंत काय आणि गरीब काय, आपण सगळेच एकाच जमीनीवर आलो आहोत. माणूस हे एकच qualification आणि तेव्हढीच काय ती आपली ओळख !!

वाईट अनुभव सोडून देऊ. चांगले अनुभवही इतके आले की एक नवीन विश्वास मनात जिवंत झाला. मित्रमंडळी, आप्तेष्ट तर बरोबर होतेच पण सुखद धक्का देऊन गेले ते काही अनोळखी जन. बातम्यांमधूनही अनेक अशा गोष्टी ऐकण्यात आल्या. कधी अनोळखी स्वीगी डिलीवरी देणाऱ्या ने सहज तब्येतीबद्दल चौकशी केली आणि अजून काही मदत हवी का असं विचारलं, तर कधी अनोळखी नवी मुंबईच्या स्टाफने  सहजच फोन ठेवता ठेवता म्हटलं , "काळजी घ्या."  !! खरं सांगते अर्ध आजारपण तर तिथेच पळून गेलं. अशा परिस्थितीतही ही काही मंडळी आपलं काम चोख बजावत होती हे फारंच आशादायक चित्र आहे. 

अचानक आलेल्या संकटाचा सामना करण्यात हजार त्रुटि तर राहिल्याचा असणार पण त्याबाबत नुसतीच तक्रार करत, सरकारला नावं ठेवत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि त्याचा काही फायदाही नाही. काम करणार्यांचं कौतुक हे त्यांचं मनोबल तर नक्कीच वाढवेल पण आजारी मंडळींचा त्याच्यावरचा विश्वासही नक्कीच वाढण्यास मदत करेल. आणि आजच्या घडीला त्या विश्वासाची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि म्हणूनंच आज मला मनापासून माझ्या चांगल्या अनुभवांबद्दल लिहावंसं वाटलं. 

सोनल मोडक
२७/०४/२०२१

4 comments:

Radhika said...

Nicely articulated.

sonal m m said...

Thank you Nilesh..bare aahat na sagale?

sonal m m said...

Thank you 😇

priyadarshan said...

Welcome back