Thursday, May 30, 2019

आपण

स्मरणांचा मौन किनारा,
स्मरणांची ओली गाज

स्मरणांची ओली गाज,
की तुझाच हा आवाज?

हे सारे शाश्वत आहे,
की काळाचा अंदाज?

रेतीवर लिहिले ते ते,
काळाने वाहून नेले

अन् तुझे नी माझे नाते,
अद्वैत होऊनी गेले !!

Friday, May 03, 2019

Bayo

तू तुझी गोष्ट सांगणं
त्यांना मान्य नाही
कारण त्यातली त्यांची
भूमिका त्यांना
आवडत नाही
तू फारच
भडक रंगवतेस
त्यांचे चेहरे

बदलतेस त्यांचे शब्द
आणि त्यांनी कधीच
न केलेल्या गुन्ह्यात
चक्क अडकवतेस त्यांना
वास्तविक पाहता
खरी गुन्हेगार तर तू
त्यांच्या जगात शिरलेली
स्वतःला सिद्ध करू पाहणारी

केवढा अक्षम्य अपराध हा
बुद्धीचा वापर
अभिव्यक्तीचा आग्रह
आणि
माणूस म्हणून
वागवलं जावं ही अपेक्षा
फारच मोठा गुन्हा
झाला हो हा

चल आता
पुरे कर तुझं
डोळ्यांवर पट्टी बांध लवकर
अज्ञानाची
अडाणीपणाची
अंधश्रद्धेचीही
आणि पाय धरून
माफी माग त्यांची

त्यांच्या उदार अंतःकरणात
थोडीशी जरी
जागा मिळवता आली
तर आणि तरच
तुझा जन्म सफल आहे बयो!

- रंगबावरी