Sunday, March 23, 2008

आपण सारे अभिमन्‍यू..

november 1999, pune.

आजच्‍या घडीला सरत्‍या शतकाच्‍या वळणावर एकूणच सर्वत्र गोंधळाची परिस्‍थिती आहे. आजचा अभिमन्‍यू त्‍याला अपवाद नाही. समाजात जसं एक गोंधळाचं वातावरण आहे, तसं ते अभिमन्‍यूच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यात सुद्‍धा आहे. त्‍याची नोकरी, त्‍याच्‍या सवयी, त्‍याच्‍या इच्‍छा आकांक्षा आणि भोवतालची रोजच्‍या संपर्कातली माणसं या सर्वात त्या‍ची कोंडी झालेली आहे. ज्‍याच्‍याकडे मन मोकळे करता येईल, जो खरा खरा मदतीचा हात पुढे करेल, अशा एका साथीदाराच्‍या तो शोधात आहे.

एकलेपणा आणि नैराश्‍य यातून बाहेर पडून त्‍याला आनंदाचे क्षण वेचायचे आहेत. त्‍यासाठी अनिश्‍चिततेच्‍या या चक्रव्‍यूहातून त्‍याची त्‍यालाच सुतका करुन घ्‍यायची आहे. त्‍याच्‍याकडे ह्‍याशिवाय दुसरा पर्याय नाहीय. परस्‍पर विरोधी गोष्‍टींनी भरलेल्‍या स्‍वत:च्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाची त्‍याला जाणीव होणं आवश्‍यक आहे. सगळीकडे गोंगाट, गजबजाट आहे आणि त्‍यातूनच त्‍याला सगळ्‍यांशी संवाद साधायचा आहे. तमाम भौतिक गरजा पुरवणारं भोवतालचं जग, जे आत्‍मशक्‍तीचा, आत्‍मोन्‍नतीचा मार्ग दाखवू शकत नाही, अशा आजच्‍या जगाचाच तो एक भाग आहे. अशा ह्‍या गोंधळलेल्‍या अवस्‍थेत तो कधी निकरावर येत तर कधी स्‍वत:ला भिरकावून दिल्‍यासारखा जगत राहतोय। समाजाची आजची अवस्‍था अशीच झाली आहे। आणि अशा वेळी अभिमन्‍यू काय किंवा एकूणच समाज काय, नेमकं कुठल्‍या प्रकारचं भविष्‍य अपेक्षितो आहे, याचा शोध घेण्‍याची वेळ आता आली आहे. मला इथे एक गझल आठवते,

अपनी मर्जीसे कहां अपने सफर पर हम है,

रुख हवा का जिधरका है उधरके हम है॥

माझं हे मत वाचणार्‍या प्रत्‍येकाने यावर विचार करावा. मला असं वाटतं हे तर मी स्‍वत: जगत आलेय आजपर्यंतं. दरवेळी स्‍वत:ला जाणता- जाणता तपासून पाहत किंवा आसपासच्‍या वातावरणाशी जमवून घेत, स्‍वत:च्‍या मनाला न पटणार्‍या गोष्‍टी करतांना मी मझी स्‍वत:ची ओळखंच विसरुन बसते. पण ही गोष्‍टं तितकीच खरी की प्रत्‍येकालाच यात एखादातरी आशेचा किरण, एक दिशा मिळतेच. तो किरण मला मिळाला आहे...

नकारात्‍मक दृष्‍टीकोण पूर्णपणे बदलायचा प्रयत्‍नं करणार आहे. पण नव्‍याच्‍या शोधात जुने गमवायचा मूर्खपणा मी करणार नाहिये. तुम्‍हीसुद्‍धा लवकरच यावर विचार करा आणि वेळ हातातून जाउ देऊ नका। -

सोनल मोडक

मोहोळ

एखादी रात्र अशी येते
आठवणींचं काहुर माजवून जाते
मन होतं सैरभैर असं
वादळात सापडलेलं पाखरु जसं

- सोनल मोडक

Thursday, March 20, 2008

सावर

रे मना सावर आता
उंच तुझी भरारी
घाल पालथ्‍या दाही दिशा
पण ये परतोनी माघारी

देश परका न मिळेल थारा
अनोळखी सारे चेहरे
इवलेसे पण घर आपुले
तुझ्या वाटेकडे लागले डोळे...

- सोनल मोडक

Sunday, March 16, 2008

बंध

असे वाटते की
अशी सांज यावी
दुरावा स्‍वत:शी
तुझ्‍याशी तुटावा

गात्रांतून स्‍वच्‍छंदी अन्‌
अंतरात घुसमटलेला
पाऊस कधीतरी
बेफाम बरसावा

बंध रेशमी तुझ्‍यासवे
अलगद असे जुळावे
जसा फुलासवे सुगंध
जसा धुक्‍याचा गहिरा रंग...

- सोनल मोडक

Saturday, March 15, 2008

अमल हल्ली ह्या अबलख घोड्याशिवाय काही करत नाही ...

दिती दीदी ने दिलेलं सुंदर गिफ्ट ...

कार आणि अमल

11 months old he's now...amal

rang de basanti again...









चांदवा

सूर्य ढळला आली सांज
आकाशी चढे सोनेरी साज

दिवसावर करे रात चढाई
प्रकाश-काळोख करती लढाई

सूर्या सारखा सूर्यदेव तो
चंद्रराजाच्‍या हाती हारतो

येती चांदण्‍या आकाशी एकेकं
साजरी कराया शीतलं जीतं

रातराणी होते मनी हर्षितं
येणार हो तिचा चांदवा मितं...

- सोनल मोडक

बकुळ

हास्‍याच्‍या मागे दु:खाची लकेर
जशी काळ्‍या ढगाला सोनेरी किनार

हातावरच्‍या रेषांचा सगळा गुंता
गाठीवर गाठी मनी पडता

बघता बघता नाती पुसंट होतात
सुकलेल्‍या पाकळ्‍या गळून पडतात

बकुळीचा सुगंध खरा अविट
नि:श्‍चेतन तरी भरे आसमंती ...

- सोनल मोडक

Friday, March 14, 2008

वणवा

का आयुष्‍यात
भाग्‍याचा भरोसा नसतो
एका ग्रहाची करावी शांतं
तर दुसरा आडवा येतो

अशी कितीतरी नवीन नाती
दिवसागणिक बनत जातात
काही जखमा अगदी भरुन जातात
तर काही भळभळून वाहतात

असे काही प्रश्‍नं कसे अवघड बनतात
तर काही भूर्रकन सुटून जातात
वाटतो प्रत्‍येक क्षण भरभरुन जगावासा
वणव्‍यात पेटलेल्‍या लाकडासारखा,
आपला अंतं बघावासा...

- सोनल मोडक

Wednesday, March 12, 2008

स्‍पर्शाच्‍या पलीकडे तू
मनाच्‍या आरशातील प्रतिमा
आरपार शुद्‍धं निर्मळ...

तुझे अस्‍तित्‍वं अर्थाच्‍या परे
जरा उलगडू दे मला माझेही मन
अमूर्त अगम्‍यं दुर्गम...

- सोनल मोडक

आधारीत

तुझ्‍या वेदनेचे हुंकार मी
शोधू कुठे आणि कसे
हुंदक्‍यांनी आड वेळी
जाग डोळा येतसे...

वाहती थंड गार वारे
शिरशिरी आली पुन्‍हा
हात पाठीवरुन फिरला
वेदना तरी उरलीचं ना...

- सोनल मोडक

Tuesday, March 11, 2008

प्रश्‍नोत्तर...

प्रश्‍नं ..

झिजलेल्‍या वस्‍त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण, विरलेल्‍या नात्‍यांना,
फाटलेल्‍या आभाळाला?
भेगाळलेल्‍या जमिनीला?
कसं रे?...
- सुषमा करंदीकर

उत्तर..

फँशन आहे ठिगळांची कपड्‍याला
नवीन नाती येतील जन्‍माला
ढगांची नक्षी रचू आकाशी
भेगांतून येइ नवे रोप वरती...

- सोनल मोडक

Thursday, March 06, 2008

बंड

बसले आज पुन्‍हा लिहायला
शब्‍दांनी पुकारले बंड
वाटले मनीचा सूर हरवला
जणू अंतरातील धग झाली थंड...

ऊन सावलीचा खेळ सारा हा
कधी श्रावण कधी वसंत
एकमेकांवर मात कराया
ऋतूंस मिळेना उसंत...

तरी पुन्‍हा पुन्‍हा तिकडेच पळे
जसे उनाड वासरू
मनं भिरभिरे वार्‍यासंगे रे
झाले जणू वेडे पाखरु...

अक्षराला जुळे एकेक अक्षरं
शब्‍दांचे पडति सडे
शब्‍दं आला मागे सूर घेवोनि
मनी गाणे उलगडे...

- सोनल मोडक

डोळ्‍यांत...

डोळ्‍यांत उतरले नभ आज
बरसले मेघ धुवांधार
सृष्‍टी ल्‍याली हिरवा साज
जागला मनी नवा उल्‍हास...

डोळ्‍यांत उतरले स्‍वप्‍नं नवे
मन झाले पाखरु आज
चांदणे मनीचे आज हवे
कुजबुजली मनी नवी गाज...

डोळ्‍यांत चमकला चंद्र आज
कलेकलेने तो उजळे
लख्‍खं चांदणे पुनवेचे ते
गर्विष्‍ठ रवीसही लाजवे...

- सोनल मोडक

Monday, February 25, 2008

सांज

आसवे उसवती धागे
गोधडी मनीची उघडे
खपली काळाची पडते
भरली जखम पुन्‍हा ओघळते

नात्‍यास नसे ते नावं
बिनपत्‍याचे ते गावं
डोळ्‍यातं हरवले भावं
धुके मनी साकळते

सांजसावली क्षितिजावरती
सागरा लागली ओहोटी
वाळूत उमटती रेषा
लाटा येवोनि पुसती

- सोनल मोडक

Saturday, February 23, 2008

मित्र

आपल्‍या निरर्थक बडबडीलासुद्‍धा patiently कान देणारा
वेळप्रसंगी कान धरुन मार्गावर आणणारा
पलिकडच्‍या किनार्‍यावर आपली वाट पाहणारा
छोटासा दिवा बनून आपली सोबत करणारा

रक्‍ताची नाती काय क्षणात तुटतात
मनाची नाती हळूहळू जुळतात
एकदा जुळली की आयुष्‍यभर फुलतात
अशीही काही आपली माणसं असतात

कुणीच आपलं नसतं
मग आपण कोणासाठी असतो
वेड्‍या मनाचं समाधान
बाकि इथे प्रत्‍येकजण एकटाच असतो

पाखरं येतात दाणा टिपून उडून जातात
क्षणभराचं नातं जोडून आठवणी सोडून जातात
विस्‍मरणात गेल्‍या तर त्‍या आठवणी कसल्‍या
बिचार्‍या आपली संगत करत राहतात

इथून दूर जाताना
अनेक वाटा माझ्‍या असतील
पावलापावलवर
आठवणी मात्रं तुझ्‍या असतील...

- सोनल मोडक

Thursday, February 21, 2008

अलिप्‍तं..

तळ गाठ एकदा
ये वरती निघोनि
तुझी तू नसशीलंच
असशील दुसरीच कुणी,

तसा तो मी
कित्‍येकदा गाठलाय
आणि वरही आलेय
पूर्‌णं कोरडी,

तरी हा दाह
चारी बाजूंनी वेढलेला
आता हा निखारा
नकोच विझायला...

- सोनल मोडक

राधा

तुझे ओठ गाती मुके गीत जेव्हा
तुझा शब्‍द भिडतो मनाच्या तळाशी
तुझा रंग अंगावरी सांडलेला
तुझा गंध भिनतो मनाच्या कळ्यांशी.....

दिले स्‍वप्‍नं गुलजार नाजुक भोळे
गुलाबी पहाटे गुलाबी क्षणांनी
कळी पाकळी उमलते मोहरुन
कळ्‍यांची फुले झाली स्‍वप्‍नील नयनी.....

बनी वाजवितो निळा कृष्‍णं वेणू
करी पैंजणे पायी अलवार रुणूझुणू
भुलू लागली ती झुलू लागली ती
प्रियाच्‍या सूरांनी बने बावरी ती.....

- सोनल मोडक

Friday, February 15, 2008

देव

अमलच्‍या बाललीलांबद्‍दल खूप काही लिहावं असं मला सारखं वाटंत राहतं,
पण शब्‍द गोळा करण्‍यात मी कमी पडतेय...अमल झपाट्‍याने मोठा होतोय.
काय लिहु आणि काय नको...तसं पाहिलं तर खूप काही आहे, पण...
हा पण कसा कुठून येतो देव जाणे.

इतका जिवंतपणा, ती विजिगिषा, सळसळता उत्‍साह...सगळं शब्‍दात पकडणं कठिणंच.

डोळ्‍यासमोर आहे ते त्‍याचं पहिलं वहिलं रुप. ते इवलेसे डोळे टकामका माझ्‍याकडे बघणारे.
त्‍यांना जाणीवही नसेल हा जो काही चेहरा दिसतोय, त्‍यावर हा जग जिंकल्या‍चा आनंद कुठूनसा आला असावा.
हिच आपली आई...आपण हिच्‍या पोटात पूर्ण नऊ महिने वाढलोय.
आपलं अस्‍तित्‍वं पूर्णतः हिच्‍या अस्‍तित्‍वावर बेतलेलं आहे.

इवलासा तो जीव...अबोध ‌‌‌. जग काय असतं तेही न पाहीलेला आणि त्‍याला नेलं माझ्‍यापासूनु मैलोन्‌मैल दूर.
आईचं दूधसुद्‍धा नाही प्‍यायला आणि हिरो निघाला गाडीमधून...एकटाच.
आहे खरा शूर सिपैया...आईशिवाय कुठून आणली ही ताकद त्‍याने.
अज्ञानाची हीच ती शक्‍ती काय. मग कशाला हवं ज्ञान...मनाला कमकुवत बनवायला.

कोण देव, काय देव, कोण आई, बाबा, आजी, आजोबा...तो कोणालाच नाही ओळखंत.
त्‍याला माहितीये फक्‍तं आपलं अस्‍तित्‍वं टिकवणं. पण ते सुद्‍धा किती दुसर्‍यांवर अवलंबलेलं...
साधं मला भूक लागलीये हे सुद्‍धा सांगता येणार नाही त्‍याला. आला आपला बिनबोभाटपणे या जगात. हा काय विश्‍वास...(काय हा विश्‍वास). ज्‍या मंडळींच्‍या हातात पडणार ते बघतील काय ते... तारायचं की मारायचं.
भयानक आहे कल्‍पना सुद्‍धा. नकोच तो विचार, विचारांतसुद्‍धा.

अगम्‍य आहे सगळं. देव देव तो हाच बहुतेक. निसर्गाचा खेळ झालं.....

-सोनल मोडक