Wednesday, April 28, 2021

मांजरं


I was never a cat person till I met Minal. The credit of introducing the joy of having cats goes to him. This one is dedicated to all the cats who taught me to love them. Thakur, Thaki, Spidey...we miss you !!

Tuesday, April 27, 2021

काळजी घ्या !!

माझं लिखाण गेली कित्येक वर्ष बंद पडलं होतं. मग काय माझं विचार करणं बंद झालं होतं? की माझ्या संवेदना बोथट झाल्या होत्या? दैनंदिन व्यवहार तर बिनधोक चालू होते. नवीन माणसं भेटत होती. चांगले वाईट अनुभव येत होते. पण मला काही नवीन बोलावसं वाटत नव्हतं. काहीसा तोचतोचपणा आल्यासारखं झालं होतं. कुठल्याही गोष्टीत नाविन्य वाटणं कमी झालं होतं. होतं असं कधी. जशी हाताची सगळी बोटं एकसारखी नसतात, तसेच सगळे दिवसही सारखे नसतात. थोडं मीठ कमी जास्तं व्हायचंच. 

मी वाट बघत होते एखाद्या बदलाची. आणि असंही नाही की मी काहीही नं करता तो यावा असा माझा अट्टाहास होता. विचारांना दिशा देणं माझ्यापरीनं चालूच होतं. शेवटी मलाच तो बदल घडवून आणायचा होता. हे मला ठाम माहीत होतं. भुतकाळात असे काही बदल मी घडवून आणलेच होते की. बरंच काही शिकायला मिळालं होतं. मी चांगलीच अनुभवसिद्ध झाले होते. कल्पनेतही विचार केला नव्हता, हा असा बदल माझ्याच नाही तर अख्या जगासमोर असा येऊन ठेपेल. कोणीच त्यादृष्टीने तयार नव्हतं. 
आधी धडपडत, थोडीशी परिस्थिती समजून घेत प्रत्येकजण सामना करायचा प्रयत्न करत राहीला. गेल्या वर्षभरात जगभरात फार उलथापालथी घडून गेल्या. अशी एकही व्यक्ती नसेल जिला परिस्थितीचा धक्का नसेल बसला. कमीजास्तं प्रमाणात का होईना पण प्रत्येकाच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. 

जेवणाचे डबेच काय बनव, भाज्या-फळं अशा जीवनावश्यक वस्तू काय विक, वयस्कर लोकांना विना मोबदला लागेल ती मदत कर, अगदीच काही नाही तर आपल्या स्टाफला पूर्ण पगारी सुट्टी दे, पैशाची मदत काय, अन् अन्नधान्याची मदत काय, असे एक नाही हजार उद्योग प्रत्येकाने आपल्या परीने केलेच असणार. शेवटी आता अशी परिस्थिती आहे की जगातला सगळ्यात श्रीमंत काय आणि गरीब काय, आपण सगळेच एकाच जमीनीवर आलो आहोत. माणूस हे एकच qualification आणि तेव्हढीच काय ती आपली ओळख !!

वाईट अनुभव सोडून देऊ. चांगले अनुभवही इतके आले की एक नवीन विश्वास मनात जिवंत झाला. मित्रमंडळी, आप्तेष्ट तर बरोबर होतेच पण सुखद धक्का देऊन गेले ते काही अनोळखी जन. बातम्यांमधूनही अनेक अशा गोष्टी ऐकण्यात आल्या. कधी अनोळखी स्वीगी डिलीवरी देणाऱ्या ने सहज तब्येतीबद्दल चौकशी केली आणि अजून काही मदत हवी का असं विचारलं, तर कधी अनोळखी नवी मुंबईच्या स्टाफने  सहजच फोन ठेवता ठेवता म्हटलं , "काळजी घ्या."  !! खरं सांगते अर्ध आजारपण तर तिथेच पळून गेलं. अशा परिस्थितीतही ही काही मंडळी आपलं काम चोख बजावत होती हे फारंच आशादायक चित्र आहे. 

अचानक आलेल्या संकटाचा सामना करण्यात हजार त्रुटि तर राहिल्याचा असणार पण त्याबाबत नुसतीच तक्रार करत, सरकारला नावं ठेवत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि त्याचा काही फायदाही नाही. काम करणार्यांचं कौतुक हे त्यांचं मनोबल तर नक्कीच वाढवेल पण आजारी मंडळींचा त्याच्यावरचा विश्वासही नक्कीच वाढण्यास मदत करेल. आणि आजच्या घडीला त्या विश्वासाची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि म्हणूनंच आज मला मनापासून माझ्या चांगल्या अनुभवांबद्दल लिहावंसं वाटलं. 

सोनल मोडक
२७/०४/२०२१

Sunday, April 25, 2021

My quarantine story

शेवटी ती वेळ आलीच. हलकासा ताप आणि विचित्र अंगदुखी ! हे दुसरं काही असूच शकत नाही हे लक्षात येताच मी स्वत:च माझी पाठवणी माझ्या खोलीत केली. यथावकाश रिपोर्ट्स ही पॉसिटीव्ह आले. दादाच माझा डॉक्टर असल्याने औषधं लगेचंच सुरू झाली होती. आणि वायरंस च्या कृपेने म्हणा किंवा ईम्युनीटी म्हणा लक्षणं अगदीच सुसह्य होती. 

घरातली दोघं मुलं सैरभैर...पहिले दोनचार दिवस परिस्थिती समजून घेण्यात गेले..मग हळूहळू कामं सुचायला लागली. तसं आमच्या घरात घरातली कामं काही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. आम्ही तिघं गरजेप्रमाणे आपआपला वाटा न सांगता उचलतो पण माझी गैरहजेरी तशी विरळाच. 

ह्या दिवसात माझा प्रवास बेडपासून खिडकी, टॉइलेट आणि फारफारतर माझी बाल्कनी इतपतंच सुरू होता. तरी बरं सकाळी कधी शेजारी चौकशी करत तर मी आपली हजर, बाल्कनीत गप्पा मारायला. दादा-भाभीकडून आठवडभराची कुमक लगेच पोचती झालीच होती. संध्याकाळचं मित्रमंडळ असायचं गप्पा मारायला गेटवर. आणि हो, खास प्रोटीन डायेटचा (चिकन, मासे, आंबोळ्या वगरै ) पुरवठा करायला. आईचा फोन नाही असा दिवस नाही. तिचा जीव तिकडे वरखाली की आपण किती दूर आणि काहीच करू शकत नाही. पण तिला काय माहित की स्वत:ची व्यवस्थित काळजी घेऊनच ती केव्हडी मोठी मदत मला करत होती. बुढ्ढा-बुढ्ढी दोघंच तिकडे एकमेकांची काळजी घेत ! मित्र-मैत्रिणींची जागा दुसऱ्या कोणी घेणं नाही. त्यांच्या फोन मुळे एकांतवास बरा सुसह्य झाला. 

ह्या काळात बरेच आत्मसंशोधन आणि साक्षात्कार झाले.

बाहेरच्या जगाची temptations आणि distractions नसतील तर मीही स्वत:ला प्रोत्साहित करून बरीच कामं शिस्तीत करू शकते. लवकरच लक्षात आलं की मी अक्षरश: काहीही न करता तासन् तास एकाजागी बसू शकते. मी चक्क जागची न हलता जगभर फिरून आले. माझे आजपर्यंतचे अविस्मरणीय प्रवास मी पुन्हा एकदा जगू शकले. माझ्या आवडत्या मंडळींनी विनासायास भेटून आले. प्लान केलेल्या पण ह्या परिस्थितीमुळे पूर्ण होऊ न शकलेल्या ट्रीप्स मी मनमुराद आनंद घेऊन पूर्ण करू शकले. 
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मी ती व्यक्ती झाले होते जी एकटीच स्वत:शीच हसू शकते. आप्त-स्वकीय न भेटताही खुशाली विचारून जातात. पक्षी येऊन गप्पा मारतात. फुलं आपल्या मनीच्या गोष्टी सांगून जातात. जिच्याशी आजूबाजूच्या वस्तू बोलायला लागतात. माझ्या गैरहजेरीतही माझी बाग भरभरून फुलत होती. महिन्याभरापूर्वी लावलेली रक्तचंदनाची बी छान रूजली होती आणि सानुकलं पोपटी रोप माझी वाट बघत होतं. 

जिजीविषा, जीवन म्हणतात ते हेच. मी मनापासून आभार मानते, की मला फारसा त्रास न देता हा व्हायरस बरंच काही देऊन गेला. पुन्हा आयुष्यात कुठलीही गोष्ट गृहित धरणं नाही! एकच आशा की आपण सर्व आलेल्या संकटातून सुखरूप बाहेर पडावे आणि कोरोना लवकरच भूतकाळात जमा व्हावा !!

सोनल मोडक
२५/०४/२०२१